Monday, August 16, 2010

sindkhedraja

सिंदखेडराजा हे माँसाहेब जिजाऊंचे जन्मस्थळ. खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्राचं मातृतीर्थ. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेलं हे ठिकाण आता एक शिवप्रेमींसाठी जिव्हाळ्याचं पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालं आहे.

हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवराय! त्यांच्या मातोश्रीचं सिंदखेडराजा हे माहेर! राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म याच पावन भूमीतला! हे जणू महाराष्ट्राचं मातृतीर्थ! मराठी मनाचा मानबिंदू! या पुण्यभूमीचं जतन, संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे! राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपले सुपुत्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. जगात एका इतिहासाची निर्मिती केली. जिजाऊ या केवळ शिवरायांच्या आई नव्हत्या तर आदर्श कन्या, आदर्श माता, आदर्श गुरू, आदर्श पत्नी व आदर्श नेत्या होत्या. जिजाऊंचे जन्मस्थळ म्हणून सिंदखेडराजा हे गांव या देशाचे सर्वश्रेष्ठ स्मारक व तीर्थक्षेत्र, ज्ञानक्षेत्र व्हावे, अशा सोनेरी स्वप्नांच्या दिशेने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सध्या सिंदखेडराजा येथे शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहे.सिंदखेडराजा हे बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण! त्याला पूर्वी अलापूर, सिंधपूर असंही म्हणत असत. सिंधुराम राजाने वसविले म्हणून ते सिंदखेड झाले. इथं नीळकंठेश्वर देवालयावर कोरलेल्या शिलालेखात ‘परगणे सिधपूर’ असा उल्लेख आहे. जाधवांच्या काळी होऊन गेलेल्या संत गोसावीनंदन यांच्या चरित्रात म्हटले आहे की, ‘सिंदखेड स्थळ, सिंद्धांताचे केवळ!’ १४५० च्या सुमारास स्थानिक काजी घराण्याला सिंदखेड परगणा जहागीर म्हणून देण्यात आला. पुढच्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्यात गेली. १५७५ च्या सुमारास यमुनाबाई मुळे या जहागीरदारीण बाईच्या विनंतीवरून बेईमान रविराव ढोणेचा पाडाव करून लखुजी जाधवांनी ती मिळविली. लखुजी राजे त्यावेळी निजामशाहीचे पंचहजारी मनसबदार होते. त्यांचे भाऊ भुलजी यांचेसह त्यांना पुढे मुर्तजा निजामशाहकडून दहा हजारी मनसबदारी, २८ महाल अन् ५२ चावडय़ांचे वतन मिळाले. नंतर पाहता पाहता सिंदखेड राजधानी बनून गेले, लोकवस्तीही ४५ हजारांपर्यंत पोहोचली आणि मग लोक सिंदखेडला सिंदखेडराजा म्हणू लागले.सिंदखेडराजाला आपण प्रवेश केला तर तेथील पुरातत्व वास्तुंच्या अवशेष खुणांनी आपण भारावून जातो. क्षणाक्षणात आपल्याला तेथील प्रत्येक अवशेषांबद्दल जाणून घ्यावेसे वाटते. नगरीच्या मधोमध बांधलेला आहे तो राजे लखुजींचा राजवाडा. देशमुखी मिळताच १५७६ च्या सुमारास त्याची उभारणी करण्यात आली. या वाडय़ाचे खरे आकर्षण आहे ते भव्य तीनमजली प्रवेशद्वार! देवडय़ा, त्यावर नगारखाना आणि त्यावर संरक्षक भिंती उभारलेला सज्जा असं त्याचं स्वरूप! दगडी कमानींच्या दोन्ही अंगास कोरलेली दोन कमळांची तबके आणि १४ दगडी नारळांचे तोरण म्हणजे शिल्प कारागिरीचा दुर्मिळ नमुनाच! या वाडय़ाचं जतन आणि दुरुस्तीचं काम सध्या महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व विभाग करत आहे.अंदाजे शंभर चौरस मीटर आकाराच्या या राजवाडय़ाच्या भव्य परिसरात प्रवेश करताच दिसतात ते, दगडी बांधकाम केलेले जोते. हा वाडा पूर्व आणि पश्चिम असा विभागलेला आहे. वाडय़ाचा पश्चिम विभाग म्हणजे राजाचा राणीवसा! या भागातील खोली जिजामातेचं जन्मस्थळ आहे. राजे लखुजींना यमुनाबाई, भागीरथीबाई आणि म्हाळसाबाई ऊर्फ गिरीजाबाई अशा तीन बायका होत्या. दत्ताजी, राघोजी, अचलोजी अन् बहादूरजी असे चार पुत्र होते. मात्र कन्या नव्हती, म्हाळसाबाईंच्या नवसाला रेणुका पावली. हेमलंबी नामसंवत्सर शके १५१९ च्या पौष शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच १२ जानेवारी १५९८ ला सूर्योदयसमयी म्हाळासाबाईंच्या पोटी जिजाऊ जन्माला आली. या पुण्यस्थळी बाल शिवबासह जिजाऊ माँ साहेबांचा देखणा पुतळा उभारलेला आहे. वाडय़ात बारा दालनांचं सुस्थितीतील तळघर आहे. त्यात प्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी काढलेले झरोके ही घरांची तत्कालीन वातानुकूलीत करणारी रचनाच! याच वाडय़ात जिजाऊ साहेबांचं बालपण गेलं. राष्ट्रभक्तीसाठी प्रेरणादायक असं हे श्रद्धेच जिवंत प्रतीक! राजे लखुजींच्या निधनानंतर बाल शिवबाचं व जिजाऊंचं वास्तव्य या वाडय़ात काही दिवस होते.राज्यशासनाच्या पुरातत्व व संग्रहालये विभागाच्या वतीने इथं वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. या संग्रहालयात इतिहासकालीन पुरातत्वीय आणि प्राचीन मूर्ति आणि वस्तू आहेत. राजवाडय़ाच्या पश्चिमेस पडक्या अवस्थेतील एक नृत्यशाळा आहे. तेथूनच काही अंतरावर सावकार वाडा म्हणून प्रसिद्ध असलेली टोलेजंग वास्तू उभी आहे. या वाडय़ाच्या तटबंदीखालील अर्धा भाग चिरेबंदी, तर वरचा विटांचा बांधकाम केलेला! तर प्रवेशद्वारावरील विटांचे नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. रंगमहाल म्हणजे राजे लखुजींची कचेरी. एका रंगपंचमीला जिजाऊ आणि शहाजी यांनी बालपणी या महालात एकमेकांवर रंग उडविला. उधळलेल्या रंगात न्हाऊन निघालेल्या त्या दोघांकडे पाहून ‘जोडा छान दिसतो’ असे राजे लखुजी उद्गारले होते. मूळ बांधकामापैकी आज फक्त पश्चिमेकडील बाजू तेवढी उरलेली आहे. दगडी बैठकीवर तसेच लाकडी खांबांवर नक्षीकाम अतिशय सुबक आहे. हस्तीदंती दगडाचे नक्षीकामही नयनमनोहर आहे.मोघल बादशहाच्या मनाईहुकमानं येथे एका बलदंड भूईकोटाचं बांधकाम अर्धवट राहिलेलं! राजे लखुजींचा खापर पणतु रावजगदेवानं या काळ्या कोटाचं बांधकाम सुरू केले होते. याची बांधणी चौकोनी असून चारही बाजूला चार बुरूज बांधलेले आहेत. हे बुरूज वर्तुळाकार असून त्याचा व्यास दहा मीटर आहे. ताशीव अन् दगडी बांधकाम असलेल्या पाच मीटर उंचीच्या या तटबंदीवरून एक जीपगाडी सहज जाऊ शकेल. तटबंदीचे ताशीव दगडी बांधकाम काही ठिकाणी उकळत्या शिश्याच्या रसात केलेले आहे. या ठिकाणी गुप्त नहर आणून सोडल्याचं सिंदखेडराजाच्या बखरकारानं नमूद केलं आहे!दि. २५ जुलै १६२९! राखी पौर्णिमेचा दिवस! निजामशाहीच्या दरबारात राजे लखुजींचा मुजरा न स्वीकारता निजामशहा निघून गेला. भरदरबारात राजांचा अपमान झाला. ते माघारी फिरले आणि दगा झाला. सब्दरखान, मोतीखान, मुखबरखान या सरदारांनी बेसावध राजे लखुजी, त्यांचे पुत्र रघोजी, अचलोजी आणि नातू यशवंतराव यांच्यावर हल्ला चढविला. तेथेच जाधव कुटूंब गारद झाले. ती राखी पौर्णिमा जिजाऊंसाठी अमावस्याच ठरली. या घटनेनंतर बंधू जगदेवराव यांनी लखुजींच्या समाधीचे बांधकाम सुरू केले. बांधकामाला १० र्वष लागली. ठाशीव चिरेबंदी बांधकाम आजतगायत कायम आहे. ही बांधणी एखाद्या ओतीव शिल्पासारखी वाटते. ही प्रशस्त आणि देखणी वास्तू चौरसाकार आहे. वास्तूचे बांधकाम कमानी घाटांचं! एकूण २४ कमानीवर घुमट उभारलेल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हत्तीवर आरूढ सिंहाच्या शिल्पाकृती, गणेशपट्टी, अनेक मूर्ति तसचं कमळाची तबके, वेलबुट्टी काळ्या पाषाणात कोरली आहेत. समाधीची बांधणी स्मृतीमंदिरासारखी आहे. लखुजींच्या समाधीसोबतच दत्ताजी, अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव यांच्या समाध्या चारही बाजूला आहेत आणि त्यावर शिवलिंग स्थापन केले आहेत. या समाधीच्या बाजूलाच राजघराण्यातील काही समाध्या आणि सतिशीला दिसतात! या सतिशीलेवर कोरलेला चार ओळींचा शिलालेखही आपल्या दृष्टीस पडतो! या वृंदावनात अश्वारूढ वीर, चंद्रसूर्य आणि वज्रचुडेमंडीत सतिचा हात कोरलेली पाषाण शिला बसवलेली दिसते.
अशी असेल जिजाऊ सृष्टीमराठा सेवा संघाने सिदखेडराजा येथे नवीन नागपूर -मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वत:च्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अशा सामूहिक ’जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. सिंदखेडराजा हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवसंस्कृतीचे आदिपीठ आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये राजमाता जिजाऊंचे कर्तृत्वामुळे अवघी शिवसंस्कृती एकसूत्रात बद्ध झाली होती. स्वाभाविकच शिवसंस्कृतीच्या या अर्वाचिन उगमस्थानाला म्हणजेच सिंदखेडराजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊंच्या जन्माचे वेळी ४५,००० लोकवस्तीच्या या शहरात त्या काळातील लखुजीराजाचा राजवाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे बघण्याजोग्या वास्तू आहेत. त्यापैकी मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊ सृष्टीची जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोडय़ावरून फेरफटका मारायच्या. त्या ठिकाणी युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या त्याच तीर्थावर आज साकारणार आहे जिजाऊ सृष्टी.जिजाऊ सृष्टी प्रकल्प हा देशाच्या स्वाभिमानाचा राष्ट्रीय प्रकल्प व्हावा, हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे, असा सर्वोच्च विचार यामागे आहे. त्यानुसार जिजाऊ सृष्टी हा विविध विषयांना सामावून घेणारा एकत्रित स्वरूप प्रकल्प व्हावा तो अद्यावत तीर्थक्षेत्र वा ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे. जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलिटरी अ‍ॅकेडमी, संशोधन केंद्र, महिला विद्यापीठ अशा संस्थांची निर्मिती व्हावी, अशी योजना आहे. त्यात ध्यानमंदिर, संशोधन विभाग, प्रार्थनास्थळांची रचना करणे, विज्ञाननिष्ठ परंपरा वृध्दींगत करणारे मेळावे भरवणे, विश्वशांती व एकसंघतेसाठी विविध चर्चासत्राचे आयोजन, विविध विषयाचे प्रशिक्षण, कार्ड कॅम्पस, कमांडो फोर्स, ट्रेनिंग सेंटर यासारख्या विविध योजना, सर्व बहुजन समाज, विज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ बनवून संपूर्ण विश्वामध्ये मानवा-मानवा मध्ये समता, समानता, बंधुत्वाची आचारसरणी व विचारसरणी मांडणारा तयार व्हावा, अशी मांडणी व आखणी करणे, हा जिजाऊ सृष्टीचा मुख्य उद्देश आहे.भारताच्या सुमारे १०,००० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास, जिजाऊ काळातील देशातील सर्व क्षेत्रातील स्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महत्वाचे प्रसंग ते इ.स. २००५ पर्यंतची देशाची वाटचाल, बहुजन समाजातील सर्व समजासुधारक, संतांची शिकवण चित्ररूपाने, शिल्परूपाने, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या सहाय्याने लिखीत स्वरूपात विविध प्रकारे चित्रीत केली जाईल.
त्यानंतर आपल्या नजरेस पडतो तो शिवकालीन वैदर्भीय जलयांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेला मोतीतलाव! त्याकाळी जगदेवराव जाधवांनी सहा लक्ष रुपये खर्चून हा तलाव बांधला होता. २५८ मीटर लांब आणि साडेतीन मीटरपासून अठरा मीटपर्यंत रुंद भिंतीचा हा तलाव आहे. आजही सिंदखेडराजा नगराला तात्पुरता नळपाणी पुरवठा या तलावातून केला जातो. जगदेवरावांच्या रसिकतेचा परिचय करून देणारा चांदणी नामक तलाव हा देऊळगांव राजा मार्गावर आहे. अंडाकृती आकाराच्या विस्तीर्ण तलावाच्या मध्यभागी दुमजली विटांची इमारत आज पडक्या अवस्थेत दिसते. चांदणी तलाव ही राव जगदेवाच्या नौकाविहाराची जागा होती. शासकीय विश्रामगृहासमोरील हा चांदणी तलाव पर्यटकांचे खास आकर्षण आहे.चांदणी तलावालगतची पूर्वेकडील विहीर म्हणजे प्रसिद्ध मनमोहक संजना बारव! विहिरीत प्रवेशासाठी पायऱ्या खोदलेल्या असून विहिरीवर दोन ओवऱ्या काढून स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे. राजवाडय़ापासून अध्र्या किलोमीटर अंतरावर खालपासून वपर्यंत पुतळ्यांनीच बांधलेली पुतळा बारव! अष्टकोनी आकाराच्या या बारवेचे बांधकाम १२ व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यानचं! शिल्पाकृती हत्तीची रांग खोदून त्यावर स्तंभ कोरलेले. याच स्तंभांच्या दक्षिण भागावर देवादिकांच्या सुबक मूर्ती, कोरलेल्या गणपती, र्तीथकर, वाद्यं वाजवणारा जमाव, नृत्यांगणा, शृंगार करणाऱ्या अभिसारिका असं या बारवेच स्वरूप आहे. पाण्यात उतरण्यासाठी पूर्व पश्चिम अन् दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. उत्तरेकडील भाग कोसळलेला असल्यानं पायऱ्यांचा मागमूस लागत नाही. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेली ही बारव दर्शकांच्या मनात ठसल्याशिवाय राहत नाही. या परिसरात यादवकालीन सचिव हेमाद्रीपंतांने केलेल्या हेमाडपंती मंदिराप्रमाणे या बारवेचे बांधकाम व शिल्पकाम असल्याने ही बारवही हेमाद्रीनी तयार केल्याचे दिसून येते. हेमाद्रीने मंदिरांव्यतिरिक्त केलेल्या वास्तूमध्ये या बारवेचा समावेश आहे.पुतळा बारवेप्रमाणेच जाधवपूर्वकालीन नीळकंठेश्वर देवालयाचा उल्लेख करता येईल. रंगमहालाजवळच भरणाऱ्या आठवडी बाजारालगत हे निलकंठेश्वराचं मंदिर. त्याचं मूळ बांधकाम हेमाडपंती, एका दगडी खांबावर अकरा ओळीचा शिलालेख कोरलेला! त्याचे वाचन असे ‘नीळ कंट श्रीगणेशाय न मा : साके १५०९ सार्वजीत सवात्सरे श्रावण सुदि पाडवा जीर्णोध्दार हे देऊळ धबांळे राघोजी लुकजी जाधव श्रीदेक्षमुष परगणे सीधपुर!’ त्यावरून देवालयाचा जिर्णोद्धार जिजामातेचे भाऊ रघोजी यांनी जिजाऊंच्या जन्मापूर्वी केला असल्याचे अनुमान आहे.निळकंठेश्वराच्या हरीहराची प्राचीन मूर्ती अत्यंत देखणी आहे. दहाव्या किंवा अकराव्या शतकात कोरलेल्या या मूर्तीची उंची नव्वद सेंटीमीटर आहे. उजवे अंग शंकराचे व डावे अंग विष्णूचे आहे. नखशिखांत कोरीवकाम केलेली ही मूर्ती म्हणजेच सिंदखेडचं वैभवच! जिजामातेसह बाल शिवबा या निळकंठेश्वराचे दर्शन घेत असत. सिंदखेडकरांचं ग्रामदैवत असलेलं रामेश्वर मंदिरही जाधव पूर्वकालीन आहे. मंदिराजवळच शरभंग ऋषींचा आश्रम होता, अशी समजूत आहे की, प्रभू रामचंद्र लंकेस जात असताना काही काळ या आश्रमात विसावले. त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली तो हा रामेश्वर! लखुजींनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. अलिकडे स्थानिक मंडळींनी जिर्णोद्धार केल्याने मूळ मंदिराचा चेहरामोहरा बदललेला आहे. पुण्यास परत जाताना बाल शिवबाराजे जिजामातेसह रामेश्वराचं दर्शन घेऊनच पुढे गेले होते.या छोटय़ाशा मंदिरातील रेणुकामातेलाच म्हाळसाबाईने कन्याप्राप्तीसाठी नवस केला होता. या मंदिराच्या डाव्या अंगाला गणपतीची जुनी देवळे असून त्याला लागूनच होमकुंडही आहेत.रामेश्वर मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर गंगासागर बारव आहे. ही अष्टकोनी आकाराची बारव जगदेवरावांनी बांधलेली आहे. बारवेत उतरवण्यासाठी पायऱ्या असून या बारवेवर एकाचवेळी बावीस मोटी चालत असत. ही अतिशय देखणी अष्टकोनी आकाराची विहीर ‘बाळ समुद्र’ या नावाने ओळखली जाते. दगडी बांधणीच्या या विहिरीचं पाणी मधुर आहे. या दोन्ही विहिरी सध्या कृषी विभागाच्या ताब्यात आहेत. या विहिरींच्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करण्यात येतो.या मातृतीर्थाला भेट देणाऱ्या जिजाऊ भक्तांसाठी इथं निवास-भोजनाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने चांदणी तलावानजीक सुसज्ज अन् सर्व सुविधांनी युक्त असे हे पर्यटक संकुल बांधून भक्तांची गैरसोय दूर केली आहे.शासनाने अमरावती महसूल विभाग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमार्फत दीड कोटी रुपयांचा सिंदखेडराजा विकास प्रकल्प राबविला. प्रखर प्रकाशझोतांचे पथदिवे मार्गाची शान अधिकच फुलवितात. लवकरच राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतिग्रंथालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. तसेच जिजाऊ ग्रामीण विद्यापीठाचा प्रस्तावही शासन दरबारी सादर केलेला आहे. मराठा सेवा संघाने ‘जिजाऊ सृष्टी’ आणि धर्मपीठ स्थापन करण्याचे योजिले आहे.गतवैभव स्मृती जपत सिंदखेडराजामध्ये गेल्या काही दशकात लोकांच्या कल्याणासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, पोलीस ठाणे, बसस्थानक, दुकानसंकुले इत्यादी उभारण्यात आली आहेत.महाराष्ट्राचा इतिहास हा शूरवीरांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी राजे महाराष्ट्राचे कंठमणी. त्यांना घडविणाऱ्या जिजाऊ माँ साहेबांना जन्म देणारा सिंदखेडराजा हा जिल्ह्यातील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे; तर संपूर्ण देशाला कारणीभूत ठरणारे मातृतीर्थ! महाराष्ट्राची महानता, विक्रम, वैराग्य, येथे आजही नांदताना आढळते. महाराष्ट्रातील जिजाऊ शिवभक्तांना आणि पर्यटकांना आकर्षित करणारं सिंदखेडराजा हे महाराष्ट्राचं मातृतीर्थ झाले आहे!